प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची   

रविवारी विशेष सोहळा

पुणे : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेली ’दख्खनची राणी’ डेक्कन क्वीन उद्या (रविवारी) प्रवासी सेवेतील ९६ वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे. शंभर वर्षाकडे वाटचाल करणारी ही रेल्वे गाडी, ही केवळ एक रेल्वे नसून, ती पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारा एक भावनिक दुवा बनली आहे, अनेक पिढ्यांच्या आठवणींची डेक्कन क्विन साक्षीदार आहे.
    
१ जून १९३० रोजी, द ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेने ’डेक्कन क्वीन’ला हिरवा झेंडा दाखवला. सुरुवातीला तिला ’ब्लू बर्ड बेबी’ असेही म्हटले जात असे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारी ही गाडी, अल्पावधीतच ’दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिली डिलक्स ट्रेन म्हणून तिचा मान आजही कायम आहे. त्यावेळी तिचे डबे इंग्लंडमध्ये बनवले होते आणि नंतर माटुंगा वर्कशॉपमध्ये त्यांना जोडणी करण्यात आली होती. हा एक मोठा तांत्रिक पराक्रम होता, ज्याने भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेची मुहूर्तमेढ रोवली.
 
सुरुवातीला कल्याण ते पुणे या मार्गावर धावणारी डेक्कन क्वीन, कालांतराने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे जंक्शन दरम्यान धावू लागली. प्रवासाच्या गरजांनुसार तिच्या थांब्यांमध्येही बदल झाले. दादर आणि शिवाजीनगर हे थांबे तिच्या इतिहासाचा भाग बनले, जे पूर्वी नव्हते. या बदलांनी तिच्या प्रवासाला अधिक लवचिकता आली. ’डेक्कन क्वीन’ ही भारतातील पहिली रेल्वे आहे, जिला डायनिंग कार (जेवणाचा डबा) आहे. यात प्रवाशांना हॉटेलसारखे बसून जेवणाची सोय मिळते. १९९५ मध्ये नवीन रेक जोडले गेले, ज्यात डायनिंग कारमध्ये आधुनिक पॅन्ट्री सुविधा (मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर, टोस्टर) आणि कुशनच्या खुर्च्या व कार्पेटसह ३२ प्रवाशांसाठी टेबल सेवा उपलब्ध करण्यात आली. हा एक अनोखा अनुभव आजही अनेक प्रवाशांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
 
वाढदिवस होणार साजरा
   
पुणे तसेच मुंबईच्या नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ’डेक्कन क्वीन’ अर्थात ’दख्खनची राणी’ १ जून २०२५ रोजी ९६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, पुणे रेल्वे स्थानकावर एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
डेक्कन क्विनने आठवणी जपल्या 
 
डेक्कन क्वीन ही आमच्यासाठी फक्त एक रेल्वे नाही, तर ती एक भावना आहे. या ९६ वर्षांच्या प्रवासात तिने अनेक पिढ्यांच्या आठवणी जपल्या आहेत. वेळेचे पावित्र्य जपणारी आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देणारी ही ’दख्खनची राणी’ नेहमीच आमच्या हृदयात एक विशेष स्थान ठेवेल. या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व पुणेकरांना आणि रेल्वेप्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती करतो.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी समूह

Related Articles